च्यायला बंगलोरला येऊन एक वर्ष झालं.....एक कीडा आला, एवढ्या दिवसात किती कन्नड़ शिकलो ते पहावं.......(इकडे राज ठाकरे पासून inspire होवून कोणी कन्नड़ येत नाही म्हणून *** वर लाथ मारून हकलायच्या आधी आलेल बरं)
एवढ्या दिवसांच्या अनुभवावरून सांगतो, कन्नड़ मधले माडी आणि कोडी (अर्थ: करा आणि द्या अनुक्रमे) हे दोन शब्द आले की अर्ध काम होतं. त्यातल्यात्यात कोडी महत्वाचा. नुसत्या कोडी वर अख्खा दिवस काढू शकता. दुकानात जाऊन छाती वर करून सरळ बोलायचं "टिंब टिंब कोडी"...... (टिंब टिंब तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टीने replace करा.....नाहीतर कन्नड़ मधे टिंब टिंब चा काही भालतासलता अर्थ होउन टिंब टिंब वर लाथ पडायची). तुमचा कन्नड़ accent पाहून दूकानदाराला कल्पना येईलच की तुम्ही कन्नड़ नाही, तो तुमच्याशी इंग्लिश मधे चालू होइल, मग काय पुढचं सगळंच सोप्प होइल......आपण आपल्या साइड ने safe असलेलं बरं, नंतर कोणी कन्नड़ बोलत नाही म्हणुन बोट दाखवायला नको. सिटी बसमधेपण "वन टिकिट कोडी" म्हटलं की काम होतं.....किती पैसे झाले ते कंडक्टर इंग्लिश मधेच सांगतो (कन्नड़ लोकांनापण) त्यामुळे आपण (पुन्हा) वाचलो.
आता माडीचा वापर करायला (म्हणजे माडी शब्दाचा...उगाचच माडीचे 'वेगळे' अर्थ घेऊ नका) थोडी ओळख व्हायला हवी. तुम्ही उगाचच अनोळखी माणसाला हे करा ते करा सांगणे चांगले दिसत नाहीना. तुम्ही ओळखीच्या माणसांशी कोडीमाडी च्या भाषेत आरामात बोलू शकता.....(वा काय नविन शब्द सापडलाय कोडीमाडी ची भाषा)
/* एक प्रसंग:
बंगलोरला आल्यानंतर दूसऱ्या दिवशी मी बंगलोर भटकायला बाहेर पडलो (कंपनीने joining date च्या बाबतीत झोल केल्यामुळे मला १५ दिवस हुंदडायला मिळाले होते....). तर मी MG रोडला (म्हणजे डोंबीवलीचा फडके रोड) जायला निघालो. आणि समस्त दक्षिण भारतामधे करू नये अशी चूक केली. कंडक्टरला हिन्दी मधे सांगितलं "MG रोड आनेकेबाद बोल देना".....आणि त्याची system च hang झाली. त्या वेळेस मी बावळटा सारखा जागा शोधत होतो त्यामुळे मला ते तेव्हा समजलच नाही. डायरेक्ट शेवटचा स्टॉप आल्यावर कळलं आपण काय गाढवपणा केला ते.
moral of the story: फक्त कोडीमाडी ची भाषा येत असताना जटिल सौंवाद करायचे झाल्यास हिन्दी ऐवजी बेधड़क इंग्लिश वापरा (इथे इंग्लिश ही स्टाईल मारायची भाषा म्हणुन वापरत नाहीत)
*/
जाम झोप आलीये यार.....उरलेला उद्या लिहीन....GN....हैप्पी गाई गाई......उद्या भेटू..............
गुड मोर्निंग........ऑफिस मधे येऊन आत्ताच मेल चेक केले......आजपण मी आल्याने किंवा न आल्याने कोणालाही फरक पडणार नाहीये....चला आपण ब्लॉग लिहायला मोकळे.............
हां तर २-३ महीने कोडीमाडी वर काढल्यावर अजुन थोडी कन्नड़ शिकायची गरज वाटायला लागली। कारण होतं काय, आपण भाभडेपणाने दुकानदाराला सांगतो "वन क्लोस्अप कोडी" आणि तो YZ किती पैसे झाले हे न सांगता मख्खपणे आपल्याकडे पहात रहातो.......च्यायला चक्रव्यूहात सापडलेल्या अभिमन्यु सारखं वाटायला लागत. मग म्हटलं ह्यावर उपाय शोधायलाच हवा.........आणि थोड्या संशोधनानंतर उपाय सापडला. कोडीमाडीचा चक्रव्यूह फोडतं ते 'येष्टू' ... (येष्टू म्हणजे किती)....बास्......आता येष्टू सापडल्यावर कशाला घाबरत नाय आपण.........दुकानदाराने मख्खपणे पाहिल्यावर डायरेक्ट येष्टू फेकतो आपण त्याच्या तोंडावर.
/* अजुन एक प्रसंग:
मी: वन पेप्सी कोडी
दुकानदार: ......... (पेप्सीची बॉटल आणून तसाच उभा रहाणार)
मी: येष्टू?
दूकानदार: इप्पतमूरू
moral of the story: अजून थोडी कन्नड़ शिकावी लागणार
*/
संध्याकाळी गंगाराम मध्ये जाऊन ३० रु चं 'learn kannada' पुस्तक विकत घेतलं. मला कळेना ३-४ शब्दात सगळं मैनेज होतं तर कन्नड़ भाषेत एवढ्या साऱ्या शब्दांची गरजच काय? मरो आपल्याला काय....मी आपलं कामच तेवढं बघायला लागलो. कन्नड़मध्ये १ ते १० आणि पुढचे अंक कसे बोलतात......१ ते १० अनुक्रमे असे:
वंदु, येरडू, मूरू, नालकू, ऐदू, आरू, एळू, एंटू, ओंबत्तु, हत्तु ......आणि त्यांच्या १० च्या पटीसाठी 'वत्तू' लावायचं शेवटी. म्हणजे साठ साठी आरवत्तू, तीस साठी मूवत्तू इ. इ. ..... exception ..... वीस साठी इप्पत्तू , आणि अंक बोलायची पद्धत तर जामच सोप्पी.......म्हणजे ४५ साठी चाळीस पाच, ७३ साठी सत्तर तीन. उदा. ४५ म्हणजे नालवत्तऐदू ....... आईशप्पथ, कसलं भारी आहे यार.........पान उलटलं......अजून एक exception...... १ ने चालू होणारे अंक 'हन्' वापरून बोलायचे.....म्हणजे १५ साठी हनैदू.....(हन् + ऐदू .......संधि की विग्रह काय म्हणतात त्यातला प्रकार). मग पुढे मी माझी ज्ञानपिपासू वृत्ति जरा दाबली......तीन अंकी संख्यांच्या फंदात नाही पडलो.......एका दिवशी दोन पेक्षा जास्त exceptions नाही पचणार.....चला आता आपल्याला अलमोस्ट बरीचशी कन्नड़ बोलता यायला लागलीये.
देवाने फारच पंचाईत केलीये.....स्वतःची पाठ थोपटायला हात नीट पाठी पर्यंत पोहोचतच नाही......काश मेरे हाथ कानून के होते.......फारच वाईट पीजे होता का?..........असो........
/* असाच एक प्रसंग:
काही कामासाठी बंगलोर जवळच्या होसाहल्ली नावाच्या एका खेडेगावात जायचं होतं. बंगलोरहून दोड्डबळ्ळापूर ला गेलो. तिथल्या बस स्टैंडवरून होसाहल्लीची बस पकडायची होती. मी एकटाच होतो. प्रसंग मोठा बाका होता. पण मला माझ्या कन्नड़ वर पूर्ण भरोसा होता. बस स्टैंड वरच्या बसेसच्या पाट्यांवर लिहिलेल्या जिलेब्या decode करण्यात काही अर्थच नव्हता त्यामुळे मला सगळ्याच बस होसाहल्लीला जाणाऱ्या वाटत होत्या. मग प्रत्येक बस समोर जाऊन प्रश्नार्थक मुद्रेने "होसाहल्लीईईई.....?" विचारायला लागलो.....लोकांच्या फिरणारया माना काळजीपूर्वक observe केल्यानंतर होसाहल्लीची बस मिळाली. बस मधे बसलो. कंडक्टर आला. माझ्या सफाईदार कन्नड़ मधे खणखणीत आवाजात म्हणालो "वंदू होसाहल्ली कोडी" .... मग येष्टू वापरून पुढचा पैषांचा व्यवहार केला.
बस रात्री ९ ची होती. १५-२० मिनिटं बस हायवे वरून धावून एका कच्च्या रस्त्याला लागली. सगळीकड़े मिट्ट काळोख... मिट्ट म्हणजे एकदमच मिट्ट...मी तर बर्याच वर्षांनी एवढा मिट्ट काळोख पहिला होता. च्यायला म्हटलं होसाहल्ली आलं तरी कळायचं कसं? बसमधे सगळी ग्रामीण जनता. त्यांना कोणालाच कन्नड़ शिवाय कोणतीच भाषा येत नव्हती. तशी मला कन्नड़ येतेच पण म्हटलं खेड्यातली आणि शहरातली कन्नड़ वेगळी निघाली तर? मग दर ५ मिनीटांनी कंडक्टर जवळ जाऊन विचारात पडल्यासारखा चेहरा करून "अम्म्म्म्म.......होसहल्लीईई?" करत करत होसाहल्लीला उतरलो. तिथेही कुट्ट काळोख (मगासचा मिट्ट काळोख आता कुट्ट झाला होता). काहीच उमजेना. शेवटी दोन स्थानीक लोक दिसले. त्यांना प्रश्नार्थक accent मध्ये त्या जागेविषयी विचारलं ......ते म्हणाले "इल्ली मुंदे...सर"..... त्यांनी हाताने दाखवलेल्या दिशेने मी टॉर्चच्या प्रकाशात चालत गेलो.....आणि शेवटी (एकदाचा) पोहोचलो.
moral of the story: आता बर्यापैकी कन्नड़ बोलता यायला लागली तर मला......
*/
हो फ़क्त एकच राहिलय.....कन्नड़मधे मुलीला प्रपोज कसं करतात ते पहायचय......प्रसंग काय सांगून येतो? आपण आपलं तयार असलेलं बरं.
awesome!! tuzi jinyasa spruhaniy ahe!! dev tuz bhal karo ;).
ReplyDeleteBtw...main kisse /* comments */ madhe taknyachi kalpana far bhari ahe...aani lihitos tar tu bharich. pan nust lihine vegle ani 100 anubhavatle marmik anubhav tipne vegle...good:)
chala...mhanje tuza bolg vachne ha ata maza virangula tharu shakto...so bangaluru-vaasi amaap marathi lokanvar daya dakhvun tu tuze likhankam chalu thev. 'Pudhcha' prasang kadhi yeil sangta yet nahi rt?...."Hou da?"
nirya, thanku...mazi itaki laal kelya baddal. kadhitari blogvar tuzyavishayi changal lihin ;)
ReplyDelete